डॉक्टर, मला काही गंभीर तर नाही ना?  सध्याच्या युगातील मनाचा आजार

डॉक्टर, मला काही गंभीर तर नाही ना? 

सध्याच्या युगातील मनाचा आजार

आजच्या काळात पोटाचे विकार, संधिवात यांसारख्या आजारांवर उपचार घेणारा एखादा रुग्ण, सर्व तपासण्या नॉर्मल असतानाही, कोणतीही स्पष्ट लक्षणे नसताना हळूच विचारतो – “डॉक्टर, मला कॅन्सर तर झाला नसेल ना?”

हा प्रश्न ऐकताना जाणवते की सध्याच्या युगातील मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गेल्या काही वर्षांत कोविड, लॉकडाऊन, जवळच्या व्यक्तींचे अकाली निधन, सामाजिक असुरक्षितता यामुळे अनेकांमध्ये अनाठायी भीती, चिंता आणि नैराश्य वाढताना दिसत आहे. काही जण आपली भीती बोलून दाखवतात, तर अनेकांना ते व्यक्त करणे गरजेचे आहे याची जाणीवही नसते. त्यामुळे वैद्य म्हणून आयुर्वेदशास्त्राच्या व्यापक दृष्टीकोनातून या समस्यांकडे पाहणे आवश्यक ठरते.

भीती : नैसर्गिक की आजार? मानवी मनात आनंद–दुःख, उत्साह–उदासीनता, राग–दया अशा भावना असणे स्वाभाविक आहे. तसेच काही प्रमाणात भीती असणेही नैसर्गिक आहे. परंतु जेव्हा ही भीती कारणाशिवाय, सतत आणि तीव्र स्वरूपात जाणवू लागते, तेव्हा ती वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज दर्शवते.

भीतीच्या अवस्थेत आढळणारी लक्षणे :

· अंग थरथरणे, हातपायांना कंप

· छातीत धडधड, दडपण

· पोटात गडबड, झोप न लागणे

· तोंड कोरडे पडणे, अस्वस्थता

ही लक्षणे वारंवार आणि तीव्र झाल्यास पुढे फोबिया, डिप्रेशन, पॅनिक अटॅक, पॅनिक डिसऑर्डर यांसारख्या मानसिक विकारांचे रूप धारण करतात.

सध्याच्या रुग्णांमध्ये दिसणारे निरीक्षण

३० ते ५० वयोगटातील अनेक रुग्णांमध्ये खालील लक्षणे वारंवार आढळतात :

· अचानक कारणाशिवाय भीती वाटणे

· घाम येणे, चक्कर येणे

· मनात सतत विचारांचा कल्लोळ

· हृदयविकार किंवा मृत्यूची भीती

या लक्षणांमध्ये फरक करण्यासाठी आवश्यक तेव्हा ईसीजी, तपासण्या करणे महत्त्वाचे असते – जेणेकरून शारीरिक आणि मानसिक कारणांमधील फरक स्पष्ट होतो.

फोबिया : कोणत्याही वयात होऊ शकतो

फोबिया कोणत्याही विशिष्ट वयोगटापुरता मर्यादित नसतो. इंजेक्शन, रक्त, उंची, पाणी, अंधार, बंद खोली, गर्दी, सार्वजनिक भाषण, प्रवास, सामाजिक संवाद – भीती कोणत्याही गोष्टीची असू शकते.

अनेक रुग्णांमध्ये “शरीरातच काहीतरी गंभीर आहे आणि डॉक्टरांना निदानच झाले नाही” अशी शंका निर्माण होऊन वारंवार डॉक्टर बदलण्याची सवय लागते. यामुळे उपचारांचा अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि मानसिक अस्वस्थता वाढत जाते.

मानसिक विकारांची संभाव्य कारणे

· मानसिक धक्का (Trauma)

· दीर्घकालीन शारीरिक आजार

· सततचा मानसिक ताण

· दडलेला भावनिक तणाव

· चहा, कॉफी, कॅफिनयुक्त पेये, निकोटीनचे अतिसेवन

· व्यसनाधीनता

· भीतीदायक घटना किंवा सतत नकारात्मक माहितीचा मारा

मानसिक आरोग्य जपण्यासाठी उपाय

· मनात ताण जाणवल्यास विश्वासू व्यक्तीशी संवाद साधा

· तणाव कधी आणि का वाढतो याचे निरीक्षण करा

· कॅफिन, निकोटीन, एनर्जी ड्रिंक्स टाळा

· भीती वाढवणारे चित्रपट, वेबसीरिज मर्यादित ठेवा

· बदल जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

आयुर्वेदिक दृष्टीने उपचार

आयुर्वेदात मानसआधिंच्या उपचारासाठी औषध, समुपदेशन, पंचकर्म व दिनचर्या यांचा समन्वय महत्त्वाचा मानला जातो.

पंचकर्म उपचारांपैकी:

· शिरोधारा

· शिरोअभ्यंग

· बस्ती

हे उपचार मनावरील तमोगुण कमी करून मानसिक स्थैर्य निर्माण करतात.

उपयुक्त औषधी वनस्पती

· ब्राह्मी – स्मरणशक्ती व मानसिक स्थैर्यासाठी

· तगर – नाडीसंस्थेचे संतुलन

· शंखपुष्पी – चिंता व झटके यामध्ये उपयुक्त

· जटामांसी – बुद्धी, धृती व स्मृती वाढवणारी

· चंदन – उष्णतेमुळे वाढलेल्या मानसिक विकारांत लाभदायी

· बला – ओज व धातुबल वाढवणारी

· अश्वगंधा – शारीरिक व मानसिक बळ देणारी

योग्य औषधोपचार, नियमितता आणि रुग्ण–वैद्य यांच्यातील विश्वास यामुळे रुग्ण दीर्घकाळासाठी मानसिक आरोग्य प्राप्त करू शकतो.

निष्कर्ष: मानसिक विकार हे दुर्बलतेचे नव्हे, तर काळजीचे संकेत आहेत. योग्य वेळी उपचार घेतल्यास आयुर्वेदाच्या मदतीने मनःशांती, स्थैर्य आणि जीवनाचा उत्साह पुन्हा मिळवणे शक्य आहे.

– डॉ. शिवकांत पाटील (M. D. Ayurved)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top